नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात राहणारे दोन मुले बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहे. त्यात अल्पवयीन मुलीसह मुकबधीर असलेला मुलाचा समावेश आहे. दोघांचे कुणी तरी अपहरण केल्याचा संशय कुटुंबियांनी वर्तविल्याने याप्रकरणी आडगाव आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना देवळाली गावात घडली. मालधक्कारोडवरील रमाबाई आंबेडकर नगर येथे राहणारा अल्पवयीन मुलगा मंगळवारी (दि.७) दुपार पासून बेपत्ता आहे. सदर मुलगा मुक्का असून त्यास बोलता येत नाही त्यास कुणी तरी पळवून नेल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक विंचू करीत आहेत. दुसरी घटना नांदूरगावात घडली. येथे राहणारी अल्पवयीन मुलगी सोमवारी (दि.६) सायंकाळच्या सुमारास परिसरातील किराणा दुकानात तेलाची पिशवी घेण्यासाठी गेली होती. बराच वेळ उलटूनही ती घरी न परतल्याने कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली असून तिला कुणी तरी फुस लावून पळवून नेल्याचा अंदाज कुटुंबियांनी वर्तविला आहे. पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून आडगाव पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.