नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हाडोळा भागात जुन्या वादातून टोळक्याने तरुणावर केलेल्या हल्ल्यात तरूण गंभीर जखमी झाला आहे. धुळवड निमित्त आयोजीत रंगपंचमी कार्यक्रमात धारदार कोयत्याने हा हल्ला करण्यात आला. या हल्याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात आठ जणांविरूध्द जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिक्या उर्फ गौरव दोंदे, गणेश उमाप, करण उमाप, गब-या रोकडे, शाम दोदे, मधुकर दोदे, आशू उर्फ नण्या दोदे, वंशिता दोंदे अशी तरूणावर हल्ला करणा-या संशयित टोळक्यातील सदस्यांची नावे आहेत. याप्रकरणी साहिल संतोष वायदंडमे (१९ रा.हाडोळा दे.कॅम्प) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. वायदंडमे हा युवक मंगळवारी (दि.७) धुलीवंदन निमित्त हाडोळा येथील बळवंत प्लाझा सोसायटीसमोर सुरू असलेला रंगपंचमी कार्यक्रम बघण्यासाठी गेला असता ही घटना घडली. वाजंत्रीवर नाचत रंग उडविणा-या नागरीकांची गंमत बघत असतांना मित्र रितीक भडांगे याने त्यास नाचण्याचा आग्रह धरला असता टोळक्याने मागील भांडणाची कुरापत काढून टोळक्याने त्यास लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत चिक्या दोंदे नामक संशयिताने कमरेस लावलेला धारदार कोयत्याने साहिल यांच्या डोक्यावर वार केला. या घटनेत साहिल वायदंडमे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक पठाण करीत आहेत.