नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीत गेस्ट हाऊस मध्ये एकत्रीत राहणा-या रुम पार्टनरने कामगाराचे पैशांचे पाकिट आणि दोन मोबाईल असा सुमारे ४३ हजाराचा ऐवज चोरुन नेला. अमरजित भयामनंदन शर्मा (रा.पटणा,बिहार) असे पसार झालेल्या संशयित पार्टनरचे नाव आहे. पोलिस पसार झालेल्या पार्टनरचा शोध घेत आहेत. याप्रकरणी रजनिश रामसुजन सिंह (२९ रा.सोनवारी जि.सतना मध्यप्रदेश) या कामगाराने तक्रार दाखल केली असून अंबड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आणि तक्रारदार हे दोघे परप्रांतीय तरूण औद्योगीक वसाहतीतील एकाच कारखान्यात काम करतात. चुंचाळे शिवारातील म्हाडा कॉलनीत कंपनीने त्यांची आपल्या मालकीच्या गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून दोघे या गेस्टमध्ये राहत होते. दि.२७ फेब्रुवारी रोजी रात्री रजनिश सिंह हा रात्रपाळीच्या कामावर गेला असता ही घटना घडली. संशयित पार्टनरने रजनिश सिंह याचे पैशांचे पाकिट आणि दोन मोबाईल असा सुमारे ४२ हजार ७०० रूपयांचा ऐवज घेवून पोबारा केला. अधिक तपास हवालदार पानसरे करीत आहेत.