नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईनाका परिसरात वेगवेगळया ठिकाणी झालेल्या दोन अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. त्यात सायकलस्वारासह मोटारसायकलस्वाराचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिस दप्तरी वेगवेगळय़ा अपघाताच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. पहिला अपघात रूची हॉटेल भागात झाला. सचिन श्रीकांत कुलकर्णी (४९) हे रविवारी (दि.५) मुंबईनाक्याकडून पंचवटीच्या दिशेने आपल्या एमएच १५ जेएफ ३८०९ या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. रूची हॉटेल समोर अज्ञात भरधाव इरटीका कारचालकाने अचानक वळण घेत दुचाकीस धडक दिल्याने कुलकर्णी जखमी झाले होते. त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी पत्नी अर्चना कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात इर्टीगा कार चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुस-या घटनेते अमिष हिरालाल कुमार (रा.उत्तरप्रदेश हल्ली सिडको) हा परप्रांतीय तरूण गेल्या २७ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास इंदिरानगर बोगद्याकडून मुंबईनाकाच्या दिशेने आपल्या सायकलवर जात असतांना अपघात झाला. सर्व्हीसरोडने तो प्रवास करीत असतांना गोविंदनगर येथील सत्यम स्विटस दुकानासमोर अज्ञात वाहनाने त्यास धडक दिली होती. या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने मावस भाऊ विजय राव यांनी त्यास तात्काळ सिडकोतील त्रिमुर्ती हॉस्पिटल येथे दाखल केले असता गुरूवारी (दि.२) उपचार सुरू असतांना डॉ.तेजस वाघचौरे यांनी त्यास मृत घोषीत केले. याप्रकरणी पोलिस शिपाई सदगीर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात वाहनाचालकाविरूध्द अपघाताची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही गुह्यांचा तपास हवालदार म्हैसधुणे करीत आहेत.