आत्महत्येचे सत्र सुरुच, वेगवेगळ्या भागात दोघांची आत्महत्या
नाशिक : शहरात वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी सोमवारी गळफास लावून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी इंदिरानगर आणि आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वडाळागावातील तलाठी कार्यालय भागात राहणा-या आरती दौलत पवार (२३ रा.गोपालवाडी) या युवतीने सोमवारी सायंकाळी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी तिला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केली असता वैद्यकीय सुत्रांनी तिला मृत घोषीत केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार खरोटे करीत आहेत. दुसरी घटना नांदूरनाका भागात घडली. इशान रविंद्र चव्हाण (२३ रा.कालवन हॉटेल समोर,मराठानगर) या तरूणाने सोमवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत जितेंद्र शर्मा यांनी दिलेल्या खबरीवरून आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार लोहकरे करीत आहेत.
महिलेच्या गळयातील सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेली
नाशिक : वृंदावननगर भागातील विखे पाटील शाळा परिसरात महिलेच्या गळयातील सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधिका वसंत जगताप (रा.विखे पाटील शाळे समोर,वृंदावननगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जगताप या रविवारी (दि.१७) रात्री जेवण आटोपून पतीसमवेत चक्कर मारण्यासाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. जगताप दांम्पत्य घरानजीकच्या विखे पाटील शाळे समोरून रस्त्याने पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळयातील सुमारे २८ हजार रूपये किमतीची सोन्याची पोत ओरबाडून नेली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खतेले करीत आहेत.