नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नामांकित आयटीसी कंपनी निर्मीती गोल्ड फ्लॅकच्या बनावट सिगारेटचे वितरण करणा-या दोघांसह किरकोळ विक्रेत्यास पोलिसांनी गजाआड केले आहे. या विक्रेत्यांच्या ताब्यातून सुमारे ६५ हजार ८५० रूपये किमतीचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात ट्रेड मार्क आणि कॉपीराईट अॅक्टनुसार तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत सुनिल गांगुर्डे (रा.दसक,ना.रोड), दौलत कृष्णानी (रा.सुभाषरोड,ना.रोड) व तरूण वासवाणी (रा.देवळालीकॅम्प) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
या कारवाईबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गांगुर्डे आणि वासवाणी हे बनावट सिगारेटचे वितरण करतांना तर कृष्णानी आपल्या नागपूर जनरल स्टोअर्स या दुकानात सिगारेटची किरकोळ विक्री करतांना मिळून आला आहे. याप्रकरणी आयटीसी कंपनीचे अमोल चंद्रशेखर बहुलेकर (रा.विमाननगर,पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. आयटीसी कंपनी निर्मित गोल्ड फ्लॅक या सिगारेटचे बनावटीकरण केले जात असल्याची माहिती कंपनीला मिळाली होती. त्यानुसार कंपनीचे अधिकारी बनावट सिगारेट निर्मीती करणा-यांचा शोध घेत असतांनाच उभे उभ दिसणारी ही सिगारेट नाशिकरोड भागात राजरोसपणे विक्री होत असल्याची माहिती कंपनीच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार बहुलेकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वत्र छापेमारी सुरू असतांना सुभाषरोड येथील कृष्णानी याच्या मालकीच्या नागपूर जनरल स्टोअर्स येथे बनावट ग्राहक पाठवून पथकाने खात्री केली असता बनावट सिगारेटचा भांडाफोड झाला. या दुकानात व्हिल्स गोल्ड फ्लॅक आणि गोल्ड फ्लॅक स्मुथ या सिगारेटचा साठा बनावट आढळून आला. या सिगारेट बॉक्सवर डीएन्डएचओ हनी ड्यू नावाचे लेबल असलेल्या प्रत्येक बॉक्सवरील बारकोडही बनावट असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून सिगारेटचे सॅम्पल तपासणी साठी पाठविण्यात आले आहेत. गांगुर्डे आणि वासवाणी यांच्या मार्फत या सिगारेटचा साठा पुरवठा करण्यात आल्याचे समोर आले असून, सिगारेट विक्रीच्या रोकडसह साठा असा सुमारे ६५ हजार ८५० रूपयांचा साठा हस्तगत करम्यात आला असून अधिक तपास हवालदार खैरे करीत आहेत.