नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जेतवननगर भागात हात उसनवार घेतलेल्या पैश्यांची मागणी केल्याने दोघांनी दुचाकी पेटवून दिली. याप्रकरणी अनुजा बाळू दिवे (रा.सेट झवेरिया शाळेजवळ,जेतवननगर जयभवानीरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोशन रामदास पवार व धिरज मसुरे अशी संशयितांची नावे आहेत. पवार याने मसुरे याच्या ओळखीच्या माध्यमातून दिवे यांच्याकडून हात उसनवार पैसे घेतले आहे. या पैश्यांची मागणी केल्याने ही घटना घडल्याचा आरोप दिवे यांनी केला आहे. दिवे पैश्यांसाठी तगादा लावत असल्याने संतप्त दोघांनी त्यांची घरासमोर पार्क केलेली दुचाकी ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिली. ही घटना रविवारी (दि.५) रात्री घडली. या घटनेत दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून अधिक तपास पोलिस नाईक शेख करीत आहेत.