नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – फुलेनगर येथे बहिणीस मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या भावास विळय़ाने हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शारदा राजू धोत्रे व विकी राजू धोत्रे असे तक्रारदारावर विळयाने हल्ला करणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी सुरेश उत्तम धोत्रे (रा.शेवाळे चाळ,नवनाथनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार व संशयित एकमेकांचे नातेवाईक असून, ते तक्रारदाराचे नात्याने भावजयी व पुतण्या आहे. धोत्रे शुक्रवारी (दि.३) फुलेनगर येथील शनीमंदिर भागात राहणा-या आपल्या आई वडिलांच्या घरी गेले होते. या ठिकाणी संशयित पुतण्या विकी धोत्रे याने बहिण पारूबाई लष्कर हिस मारहाण केल्याची माहिती मिळाल्याने ते जाब विचारण्यासाठी गेले असता ही घटना घडली. आत्यास का मारहाण केली याबाबतचा जाब विचारण्यासाठी धोत्रे गेले असता संशयित भावजयीने त्यांना शिवीगाळ करून गच्ची पकडत मारहाण केली. यावेळी आईच्या मदतीला धावून आलेल्या पुतण्याने चुलत्यावर धारदार विळय़ाने हल्ला केला असून या घटनेत धोत्रे यांच्या पाठीवर व खांद्यावर वार करण्यात आल्याने ते जखमी झाले आहेत. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.