बंगला आणि घर फोडून चोरट्यांनी सोन्याचांदीचे दागिनेसह वस्तू केल्या लंपास
नाशिक : राजीवनगर भागातील बंगला आणि घर फोडून चोरट्यांनी सोन्याचांदीचे दागिनेसह वस्तू लंपास केल्या. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास भालचंद्र पत्की (रा.विठ्ठल मंदिरामागे,राजीवनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पत्की कुटुंबिय ९ ते १४ जुलै दरम्यान बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याच्या टेरेसचा पत्रा तोडून घरात प्रवेश केला व कपाटातील सोन्याचांदीचे दागिणे आणि तांबे पितळाची भांडी असा सुमारे २० हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याच काळात चोरट्यांनी शेजारी सुरेश दगडोबा पवळे (रा.मानद अपा.) यांचेही घरफोडले असून, किरकोळ सामानाची चोरी केल्याची पोलिस दप्तरी नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास जमादार बोराडे करीत आहेत.
मोबाईल दुकानातून चोरट्यांनी ६७ हजाराचा ऐवज केला लंपास
नाशिक : मोबाईल दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे ६७ हजाराचा ऐवज चोरून नेल्याची घटना नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी चौकात घडली. या दुकानातून चोरट्यांनी नवे व रिपेअरिंगसाठी आलेले मोबाईल, हेडफोन व स्मार्ट वॉच चोरुन नेल्या. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोविंद राजेंद्र टोकसे (रा.मधुबन पार्क,उपनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. टोकसे यांचे छत्रपती शिवाजी चौकातील जनता हार्डवेअर जवळ फोन सर्व्हीस नावाचे मोबाईल विक्री आणि दुरूस्तीचे दुकान आहे. रविवारी (दि.१७) रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या छताचा पत्रा कापून ही चोरी केली. दुकानात शिरलेल्या चोरट्यांनी नवीन व दुरूस्तीसाठी आलेले मोबाईल, हेडफोन, स्मार्ट वॉच व अन्य वस्तू असा सुमारे ६६ हजार ७९८ रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक जगताप करीत आहेत.