नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंचवटी कॉलेजसमोरील उड्डाणपूलावर वाहनाखाली झोपून दुरूस्ती करीत असतांना शेजारून धावणा-या मालट्रकचे चाक पायावरून गेल्याने कंटेनर चालकाचा मृत्यू झाला. फिरोज उस्मान खान असे मृत कंटेनर चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात पसार झालेल्या ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मृत खान यांचा भाचा अफजल हमीद शेख (रा.संत कबीरनगर,द्वारका) यांनी तक्रार दाखल केली आहे. मृत खान यांचा कंटेनर रविवारी (दि.५) सायंकाळच्या सुमारास पंचवटी कॉलेज समोरील उड्डाणपूलावर बंद पडला होता. त्यामुळे ते वाहनाखाली झोपून दुरूस्ती करीत असतांना हा अपघात झाला. मुंबई कडून धुळय़ाच्या दिशेने भरधाव जाणा-या आरजे ११ जीबी ३७७२ या मालट्रकचे चाक त्यांच्या पायावरून गेल्याने ते जखमी झाले होते. उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.