नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अचानक शहरात राबविण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये ११ संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर हे कोम्बिंग ऑपरेशन शुक्रवारी मध्यरात्री राबविण्यात आले. या ऑपरेशनमध्ये एकूण १२६ सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे हद्दपार करण्यात आलेल्या ५१ संशयितांच्या घरी झाडाझडती झाली. त्यावेळी हद्दपार करण्यात आलेल्या ११ जणांना ताब्यात घेण्यात आले.
शुक्रवारी रात्री ११ पासून हे कोम्बिंग ऑपरेशन तीन शहर आयुक्तालयाच्या हद्दीत सुरु करण्यात आले. ते मध्यरात्रीपर्यंत सुरु होते. मोठ्या पोलिसांच्या फौजफाटयासह हे ऑपरेशन पूर्ण करण्यात आले. या ऑपरेशनमध्ये तीन पोलीस उपायुक्त, सर्व विभागांचे सहायक आयुक्त, पंधरा पोलीस निरीक्षक, २९ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, २३६ पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला. यावेळी संशयित गुन्हेगारांसह सराईत गुन्हेगारांची शहरातील आडगाव, म्हसरुळ, पंचवटी, मुंबईनाका, सरकारवाडा, गंगापूर, सातपूर, अंबड, इंदिरानगर नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत फुलेनगर, पंचवटी नाशिक, नीलगिरीबाग, नांदूरनाका, अश्वमेध नगर, शांती नगर, मखमलाबाद आदी परिसरात झाडाझडती घेण्यात आली.
त्यात १२८ रेकॉर्डवरील गुन्हेगार, हिस्ट्रीशिटर गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. यावेळी ६४ संशयितांवर कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे हद्दपार करण्यात आलेल्या ५१ गुन्हेगारांच्या घरात तपासणी करण्यात आली. त्यात ११ संशयित हद्दपार व्यक्ती घरी आढळल्या. या ऑपरेशनमध्ये ५८ टवाळखोरांवर महाराष्ट्र पोलिस कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.