नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – व्ही.एन.नाईक महाविद्यालयाच्या आवारात पार्क केलल्या दुचाकींची डिक्की उघडून चोरट्यांनी विद्यार्थ्यांचे मोबाईल लंपास केले. या घटनेत सुमारे एक लाख रूपये किमतीचे सहा मोबाईल चोरट्यांनी चोरून नेले असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम सुरेश आव्हाड (१७ रा.अक्षय अपा. चेतनानगर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. आव्हाड नाईक महाविद्यालयाचा विद्यार्थी असून तो नेहमीप्रमाणे शुक्रवारी (दि.३) आपली अॅक्टीव्हा दुचाकी घेवून कॉलेजला गेला होता. डोंगरे वस्तीगृहास लागून असलेल्या कॉलेजच्या पार्किंगमध्ये त्याने आपली अॅक्टीव्हा पार्क केली असता ही घटना घडली. महाविद्यालयात मोबाईल बाळगण्यास बंदी असल्याने त्याने आपला मोबाईल दुचाकीच्या डिक्कीत ठेवला होता. अज्ञात चोरट्याने आव्हाड याच्या दुचाकीसह अन्य विद्यार्थ्यांच्या मोटारसायकलींचे डिक्की तोडून त्यात ठेवलेले सुमारे ९४ हजार रूपये किमतीचे सहा मोबाईल चोरून नेले. अधिक तपास हवालदार अहिरे करीत आहेत.