नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महापालिकेच्या स्ट्रीट लाईट देखभाल दुरूस्तीचे काम पाहणा-या तिघांविरूध्द मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा महिन्यापूर्वी जुने नाशिक भागात इलेक्ट्रीक शॉक लागून सायकलस्वाराचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. रत्नाकर कृष्णदेव मिश्रा (रा.एक्का अपा. पाथर्डीफाटा), विशाल देविदास गायखी (रा.तिरूमला अपा. उत्तरानगर, तपोवनरोड) व निलेश गिरीधर कुवर (रा.तोरणानगर, सिडको) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
संशयित मिश्रा टाटा प्रोजेक्ट प्रा.लि. या कंपनीचे मॅनेजर असून गायखी इंजिनिअर आहेत. तर कुवर हे नंदिनी एंटरप्रायझेस या कंपनीचे ठेकेदार आहेत. या घटनेत बबलू वकील खान (२३ रा.फेमस बेकरी,जुने नाशिक) या युवकाचा मृत्यू झाला आहे. खान गेल्या ८ सप्टेंबर रोजी रात्री मुसळधार पाऊस सुरू असतांना द्वारकाकडून आपली सायकल लोटत उस्मानिया चौकाच्या दिशेने जात होता. काझी कब्रस्थान समोरील मनपाच्या स्ट्रीट लाईट पोल मध्ये करंट उतरल्याने ही घटना घडली होती.
पाण्यात करंट उतरल्याने खान याचा मृत्यू झाला होता. पोलिस तपासात मनपाचे ठेकेदार असलेल्या संबधीतानी निष्काळजीपणा केल्याने तरूणास जीव गमवावा लागल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. देखभाल दुरूस्ती करणा-या संबधीतांनी पोलमध्ये विद्यूत सुरक्षेच्या दृष्टीने ईएलसीबी अथवा एमसीबी न बसविल्याने ही घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. पावसाळी उपाययोजना नसल्याने पोलमध्ये शॉर्टसक्रिट होवून परिसरात करंट उतरल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. याबाबत अंमलदार भगवान भोये दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक संदिप पाटील करीत आहेत.
शेजाऱ्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
सिडको भागात दोघा मैत्रीणींचा पाठलाग करीत शेजारी राहणा-या तरूणाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोक्सो) कायंद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडीता व संशयित एकमेकांचे शेजारी असून मुलगी तिच्या मैत्रीणी समवेत परिसरातील दुकानात किराणा घेण्यासाठी गेली असता ही घटना घडली. संशयितांने दोघींचा पाठलाग करीत त्यांची वाट अडविली. यावेळी मुलीने त्यास जाब विचारला असता संशयिताने तिला शिवीगाळ व दमदाटी करीत तिचा विनयभंग केला. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.