जुगार खेळणा-या सहा जणांवर कारवाई; ६ हजार ६२० रूपयाचा मुद्देमाल हस्तगत
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुगार खेळणा-या सहा जणांवर कारवाई करत पोलिसांनी रोकडसह जुगाराचे साहित्य असा सुमारे ६ हजार ६२० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली.
जोसेफ सुरेश जाधव,विकास दीपक गायकवाड,विक्रम प्रकाश जाधव,अर्जुन मनोहर गायकवाड,संजय मारूती जाधव,जलालुद्दीन फिदा हुसेन शेख (रा.सर्व होलाराम कॉलनी,कस्तूरबानगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित जुगारींची नावे आहेत. युनिटचे पोलिस नाईक प्रशांत मरकड यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मिशन मळयातील डब्ल्यूएसएस जवळ काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती पथकास मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.३) पोलिसांनी छापा टाकला असता संशयित कल्याण नावाचा मटका जुगार खेळतांना मिळून आले. या कारवाईत ६ हजार ६२० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून अधिक तपास पोलिस नाईक लोंढे करीत आहेत.
……….
आत्महत्येचे सत्र सुरुच; पंचवटी परिसरातील वेगवेगळया भागात दोन घटना
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंचवटी परिसरातील वेगवेगळया भागात राहणा-या ७० वर्षीय वृध्देसह ४५ वर्षीय इसमाने शुक्रवारी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेत महिलेने विषारी औषध सेवन करून तर पुरूषाने गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात वेगवेगळया मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. पहिली घटना तारवालानगर भागात घडली. शरद सुखदेव भांगरे (४५ रा.लोखंडेमळा) यांनी शुक्रवारी घरात कुणी नसतांना अज्ञात कारणातून किचनमधील पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मुलगी शाळेतून आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. सुभाष जाधव यांनी याबाबत खबर दिली. दुस-या घटनेत राधा रमेश कंडारे (७० रा.कृष्णनगर गार्डन शेजारी) या वृध्देने शुक्रवारी दुपारच्या सुमारास आपल्या राहते घरात अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच नातू गणेश गायकवाड यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. दोन्ही घटनांप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात वेगवेगळय़ा मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या असून अधिक तपास पोलिस नाईक भोये व माळवाळ करीत आहेत.