नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील जेलरोड परिसरात अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. स्कूल व्हॅनच्या चाकाखाली आल्याने आठ वर्षीय चिमुरडी ठार झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपेक्षा नवज्योत भालेराव (०८ रा.हरिओम दर्शन सोसा.पवारवाडी) असे मृत शाळकरी मुलीचे नाव आहे. अपेक्षास तात्काळ उपचारार्थ हलविण्यात आले मात्र उपचारापूर्वीच वैद्यकीय सुत्रांनी तिला मृत घोषित केले.
याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अपेक्षा भालेराव ही शुक्रवारी (दि.३) नेहमीप्रमाणे आपल्या शाळेत गेली होती. सायंकाळच्या सुमारास ती स्कूल व्हॅन मधून घर परिसरात परतली असता ही घटना घडली. व्हॅनमधून उतरून ती घराकडे जात असतांना चालकाने आपले वाहन वळविण्यासाठी रिव्हर्स घेतला असता ही दुर्घटना घडली. चालकाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली असून स्कूल व्हॅनने धडक दिल्याने ती मागील चाकाखाली आली होती. या घटनेत अपेक्षाच्या शरिरावरून व्हॅनचे चाक गेल्यान ती गंभीर जखमी झाली होती. कुटुंबियांनी तिला तात्काळ नजिकच्या जयराम भाई हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता उपचारापूर्वी डॉ. परेश अलवाणी यांनी तिला मृत घोषीत केले. याबाबत डॉ.सुनिल मोकासरे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार भोळे करीत आहेत.