नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आडगाव शिवारात एकाच दिवशी अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यात एक तरुण व तरुणी आहे. या दोन्ही घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या आहे. पहिल्या घटनेत आडगाव शिवारातील वृंदावननगर येथे साहिल पवार या विद्यार्थ्याने गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास चौदा मजली इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केली. तो इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरचे शिक्षण घेत होता. इमारतीच्या टेरेसवरुन उडी घेतल्यानंतर त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉ. सुनील बेंद्रे यांनी त्याला तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दुस-या घटनेत २० वर्षाच्या विद्यार्थिनीने म्हाडाच्या स्वप्नपूर्ती सोसायटीतील राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. आडगाव शिवारातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात ती शिक्षण घेत होती. कल्याणी राजाराम थापाळे असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.