नाशिक : खडकाळी भागात दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही या कारणातून तरूणास लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत युवक जखमी झाला असून पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखील विनोद कंडारे (२१ रा.रॉयल हेरिटेज पाठीमागे,पंचशिलनगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी रिजवान अनिस शेख (२६ रा.पंचशिलनगर,गंजमाळ) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. रिजवान शेख रविवारी (दि.१७) सायंकाळी भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेला होता. भाजीपाला घेवून तो घराकडे परतत असतांना ही घटना घडली. खडकाळी सिग्नल भागातील देशी दारू दुकान परिसरातील तुलसी फर्निचर दुकानासमोरून तो पायी जात असतांना संशयिताने त्यास अडवून दारू सेवन करण्यासाठी पैश्यांची मागणी केली. यावेळी शेख याने पैसे देण्यास नकार देताच संशयिताने शिवीगाळ करीत त्यास लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यावेळी संतप्त कंडारे याने खिशातील धारदार वस्तू डोक्यात मारल्याने शेख जखमी झाला असून अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.