नाशिक : एमजीरोडवरील यशवंत व्यायामशाळेजवळ रात्री वाजेच्या सुमारास शिवसेनेचे पदाधिकारी निलेश उर्फ बाळा कोकणे यांच्यावर चार अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्यावर धारधार शस्त्राने वार करण्यात आले. या घटनेनंतर स्थानिका लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास बाळा कोकणे हे त्यांच्या दुचाकीने एमजीरोडवरून जात असतांना त्यांच्यावर पाठीमागून हा हल्ला करण्यात आला. त्यानंतर घटनास्थळावरून हल्लेखोर पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच भद्रकाली, सरकारवाडा पोलीस ठाण्यांचे गस्ती पथके घटनास्थळी दाखल झाली. या हल्लेखोरांचा पोलिस शोध घेत असल्याची माहिती भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांनी सांगितले. या हल्ल्यामागील नेमके कारण मात्र समजू शकले नाही.