नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुथूट फिनकार्प फायनान्स कंपनीच्या अधिका-याकडून दोन लाखाची रोकड घेवून पसार झालेल्या ग्राहकाला पोलिसांनी गजाआड केले आहे. प्रथमेश उर्फ गुच्छा शाम पाटील (२५ रा. मोदकेश्वर वसाहत काझीगडी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. सोने सोडविण्याचा बहाणा करून त्याने फायनान्स कंपनीच्या अधिका-यांची रोकड लंपास केली होती. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाणे हद्दीतही याचप्रकारे फसवणुकीचा गुन्हा केल्याचे समोर आले असून, त्यास गंगापूर पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली. खंडणी विरोधी पथकाचे भगवान जाधव यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सोमवारी (दि.२७) गोल्फ क्लब मैदान परिसरात संशयिताला ताब्यात घेण्यात आले.
२१ फेब्रुवारी रोजी घडली होती घटना
२१ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास संशयित भाभानगर येथील मुथूट फिनकार्प या फायनान्स कंपनीच्या शाखेत गेला होता. यावेळी त्याने आपले सात तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे बजाज फायनान्स कंपनीच्या थत्तेनगर शाखेत दोन लाख रूपयांना गहाण ठेवले असून ते सोडवून तुमच्या कंपनीत ठेवायचे असल्याचे सांगितले. त्यामुळे तक्रारदार कृष्णाजी शिंदे यांनी कागदपत्रांचा शहानिशा करीत एका सहका-यास सोबत घेवून थत्तेनगर येथील क्रोमा शोरूम परिसरातील बजाज फायनान्स कंपनीच्या पार्किंगमध्ये थांबले असता ही घटना घडली. संशयिताने दोन लाखाची रोकड ताब्यात घेत दागिणे सोडवून आणण्याचा बहाणा करून रोकड घेवून पोबारा केला होता. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. खंडणी विरोधी पथकाने त्यास सापळा रचून जेरबंद केले असून त्याने असाच फसवणुकीचा प्रकार पंचवटी पोलिस ठाणे हद्दीतही केल्याचे समोर आले आहे. ही कारवाई सहाय्यक निरीक्षक प्रविण सुर्यवंशी,जमादार सगळे,हवालदार रोकडे,राजेंद्र भदाणे,पोलिस नाईक चकोर,स्वप्निल जुंदे,भगवान जाधव,भुषण सोनवणे,मंगेश जगझाप व सविता कदम आदींच्या पथकाने केली.