नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असलेल्या ठेवीवरील रकमेवर परस्पर कर्ज काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदरची रक्कम ऑनलाईन लांबविण्यात आली होती, पण बँकेत ग्राहकाने वेळीच धाव घेतल्याने सुमारे पाच लाख रूपयांची रोकड परत मिळविण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.
सातपुर येथील भरत वामन कासार यांच्या खात्यातून ही रक्कम लांबविण्यात आली होती. पण, सायबर पोलीसांनी बँक नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क करत हे व्यवहार थांबवण्याची सुचना केली. सायबर पोलीसांनी कौशल्य वापरत पैसे कोठे जावू शकतात याबाबत तपास करत संबंधितांना मेल केले. त्या अनुषंगाने तक्रारदार यांच्या बँक खात्यातून काढून घेतलेल्या पैशांपैकी ४ लाख ९९ हजार ९९९ रुपये परत मिळवून दिले. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक सुरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दानिश मन्सुरी पोलिस नाईक संतोष काळे व हवालदार किरण जाधव आदींनी केली.
अशी केली फसवणूक
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये खाते आहे. मुलीच्या लग्नासाठी त्यांनी सात लाख रुपये मुदत ठेव मध्ये ठेवले होते. सायबर भामट्यांनी बुधवारी (दि.२२) पॅनकार्ड व्हेरिफिकेशनच्या बहाण्याने त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यासाठी टेक्स्ट मेसेजवर लिंक पाठविण्यात आली होती. ही लिंक डाऊनलोड करावयास भाग पाडून भामट्यांनी बँक खात्याची व नेट बॅकींग आयडी पासवर्डची माहिती भरण्यास लावून स्टेट बँकेच्या युनो अॅप मधून केलेल्या फिक्स डिपॉझिटवर सुमारे ५ लाख २५ हजाराचे ओ.डी.लोन परस्पर मंजूर करून घेत सदरची रक्कम विविध बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली होती. हा प्रकार कासार यांच्या उशीराने लक्षात आला. सायबर पोलीस ठाण्यात या विषयी संपर्क साधला असता फसवणुक झाल्याचे लक्षात आले.
सायबर पोलीसांशी संपर्क साधावा
आभासी पध्दतीने आपली फसवणूक झाल्याचे नागरीकांच्या लक्षात आल्यास त्वरीत सायबर पोलीसांशी संपर्क साधा किंवा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल हेल्पलाईन १९३० या क्रमांकावर संपर्क साधत तक्रार नोंदवावी. तसेच ओटीपी देवून आभासी पध्दतीने फसवणुक झाली असल्यास गृह मंत्रालय, भारत सरकार व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त हेल्पलाईन नंबर १५५२६० वर तक्रार नोंदवावी असे आवाहन पोलीसांनी केले आहे.