नाशिक – दुचाकी चोरी करणा-या टोळीला पोलिसांनी गजाआड करुन त्यांच्याकडून १४ मोटारसायकली हस्तगत केल्या आहे. अटक केलेल्यांमध्ये अमोल दशरथ पाटील (२३), विशाल अधिकार पाटील (२२ रा. दोघे मांडळ ता.अमळनेर,जळगाव), दिनेश सुनिल पाटील (रा.आनोरी – जवखेडा ता.अमळनेर,जळगाव) व मल्हारी रावसाहेब पाटील (२२ रा.सबगव्हाण – चौभारी ता.अमळनेर,जळगाव) या आरोपींचा समावेश आहे. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने ही कारवाई केली. या टोळीच्या अटकेने सरकारवाडा, सातपुर सह अमळनेर आणि परप्रांतातील गुन्हे उघडकीस आले आहेत.
शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ चे कर्मचारी प्रविण वाघमारे यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. अमळनेर जि.जळगाव येथील काही तरूण शहरातून मोटार सायकली चोरून नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गेल्या गुरूवारी (दि.१४) युनिट १ वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक अमळनेर येथे रवाना झाले होते. पथकाने मांडळ गाव गाठून अमोल व विशाल पाटील या दुकलीस बेड्या ठोकल्या असता दुचाकी चोरट्यांचा भांडाफोड झाला. पोलिस तपासात त्यांनी उर्वरीत दोघा साथीदारांची नावे सांगितल्याने त्यांनाही अटक केली असता संशयितांनी चोरीच्या सुमारे सहा लाख रूपये किमतीच्या १४ मोटारसायकली काढून दिल्या. या टोळीच्या अटकेने सरकारवाडा दोन,सातपूर सहा,अमळनेर दोन,मध्यप्रदेशातील बडवाह पोलिस ठाणे हद्दीतील आणि अन्य ठिकाणचे तीन गुन्हे उघडकीस आले आहे. ही कारवाई उपनिरीक्षक विष्णू उगले,अंमलदार रविंद्र बागुल,प्रदिप म्हसदे,आसिफ तांबोळी,शरद सोनवणे,प्रविण वाघमारे,प्रशांत मरकड,महेश साळुंके,विशाल देवरे व आण्णासाहेब गुंजाळ आदींच पथकाने केली.