गहाण सोने सोडविण्याचा बहाणा करीत फायनान्स कंपनीला दोन लाखाला गंडा
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – फायनान्स कंपनीला दोन लाखास गंडा घालणा-या विरुध्द गंगापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गहाण सोने सोडविण्याचा बहाणा करीत ही फसवणूक करण्यात आली आहे. प्रथमेश शाम पाटील असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी कृष्णाजी देविदास शिंदे (रा.अष्टविनायक चौक,सिडको) यांनी तक्रार दाखल केली आहे. शिंदे मुथूट फिनकॉर्प या कंपनीच्या भाभानगर शाखेत नोकरी करतात. मंगळवारी (दि.२१) सकाळच्या सुमारास संशयित शिंदे यांच्या फायनान्स कंपनीच्या शाखेत आला होता. यावेळी त्याने आपले सात तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे बजाज फायनान्स कंपनीच्या थत्तेनगर शाखेत दोन लाख रूपयांना गहाण ठेवले असून ते सोडवून तुमच्या कंपनीत ठेवायचे असल्याचे सांगितले. त्यामुळे शिंदे यांनी कागदपत्रांचा शहानिशा करीत एका सहका-यास सोबत घेवून थत्तेनगर येथील क्रोमा शोरूम परिसरातील बजाज फायनान्स कंपनीच्या पार्किंगमध्ये थांबले असता ही घटना घडली. संशयिताने दोन लाखाची रोकड ताब्यात घेत दागिणे सोडवून आणण्याचा बहाणा करून रोकड पदरात पाडून पोबारा केला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बैसाणे करीत आहेत.
पहिल्या पतीस जीवे मारण्याची धमकी देऊन पत्नीसह तिच्या कुटुंबियांनी बेदम मारहाण
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्गावरील छान हॉटेल भागात पहिल्या पतीस जीवे मारण्याची धमकी देत पत्नीसह तिच्या कुटुंबियांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत लोखंडी पाईपाचा वापर करण्यात आल्याने सदर व्यक्ती जखमी झाला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अफ्रिन शेख, परवेज शेख आसिफ शेख व अन्य एक जण अशी मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी बाबू पप्पू अन्सारी (३२ रा.म्हाडा बिल्डींग,भारतनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. अन्सारी रविवारी (दि.१९) रात्री मुंबईनाक्याकडून भारतनगरच्या दिशेने आपल्या लहान मुलांना सोबत घेवून घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. छान हॉटेल भागात संशयित टोळक्याने गाठून अन्सारी यांना शिवीगाळ व यापूढे तू या भागात दिसला तर मारून टाकू अशी धमकी देत बेदम मारहाण केली. या घटनेत लोखंडी पाईपाचा वापर करण्यात आल्याने अन्सारी जखमी झाले असून अधिक तपास हवालदार म्हैसधुणे करीत आहेत.







