व्यसनमुक्ती केंद्रातून पळून जाण्याच्या नादात झाडावरून पडल्याने ४४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळाली कॅम्प भागात व्यसनमुक्ती केंद्रातून पळून जाण्याच्या नादात झाडावरून पडल्याने ४४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. गणेश हिरासिंह गोरखा (४४ रा.अॅक्सापॉईंट लॅमरोड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. व्यसनाधिनतेमुळे गोरखा यांना कुटुंबियांना गेल्या मंगळवारी (दि.२१) देवळाली कॅम्प येथील डॉ. आनंद पाटील यांच्या व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते. गोरखा यांच्यावर उपचार सुरू असतांना गोरखा यांनी केंद्रातून पळून जाण्याच्या प्रयत्न केला. टेरेसवरून आवारातील झाडावर चढण्याचा प्रयत्न करीत असतांना अचानक फांदी तुटल्याने ते जमिनीवर कोसळले होते. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने त्यांना बिर्ला हॉस्पिटल मार्फत जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक भुजबळ करीत आहेत.
आत्महत्येचे सत्र सुरूच; वेगवेगळय़ा भागात राहणा-या दोघांची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेगवेगळय़ा भागात राहणा-या दोघांनी गुरुवारी आपल्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. याप्रकरणी अंबड आणि भद्रकाली पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पहिली घटना जुने नाशिक परिसरातील चव्हाटा भागात घडली. निलेश निवृत्ती सोनवणे (२९ रा. अंधारी मंडपा शेजारी, दळवी वाडा) या युवकाने गुरूवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात लोखंडी हुकाला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत रविंद्र सोनवणे यांनी दिलेल्या खबरीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक धाबळे करीत आहेत. दुसरी घटना औद्योगीक वसाहतीतील दत्तनगर भागात घडली. येथे राहणा-या गौतम हरिभाऊ शिंदे (रा.सी आनंद वाटीका,दत्तनगर) यांनी गुरूवारी आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी सचिन जंजाळ यांनी दिलेल्या खबरीवरून अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक देशमुख करीत आहेत.