नाशिक : शहरात तीन घरफोडींमध्ये चोरट्यानी सुमारे पावणे दोन लाखाच्या ऐवज लंपास केला. या घरफोडींमध्ये चोरट्यांनी दोन दुकान आणि मॉलमधील शॉपचा समावेश आहे. याप्रकरणी मुंबईनाका, भद्रकाली आणि इंदिरानगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिली घटना वासननगर भागात घडली. याप्रकरणी दशरथ रामचंद्र बडगुजर (रा.सोनवणे मळा,चेतनानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. बडगुजर यांचे गामणे मळा जॉगिंग ट्रक समोरील पाणीनी सोसायची भागात गीता फोटो स्टुडिओ आहे. अज्ञात चोरट्यांनी शनिवारी (दि.१६) रात्री स्टुडिओच्या शटरचे दोन्ही लॉक कापून लॅपटॉप,प्रिंटर,कॅमेरा,फ्लॅश,चार्जर,पेनड्राईव्ह आणि हार्डडिस्क असा सुमारे ५५ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार गारले करीत आहेत. दुसरी घटना फाळकेरोडवरील नाशिक एन्टरप्रायझेस या दुकानात घडली. सलीम सुलतान अली लाखानी (रा.तपोवनरोड,द्वारका) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. लाखानी यांच्या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी तांब्याच्या तारीचे चार बंडल व सात पट्या असा सुमारे ३० हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मोहिते करीत आहेत. तिसरी घटना त्र्यंबकनाका येथे घडली. येथे आकाश रविंद्रसिंग बायस (रा.गोसावीनगर) यांचा पिनॅकल मॉलमध्ये रिलायन्स सुपर स्टोअर्स आहे. सोमवारी (दि.११) रात्री अज्ञात चोरट्यांने दुकानात लपून बसून शॉपमधील ड्रायफुड,नॉन फुड, कॉस्मेटीक वस्तू आणि डोनेशन बॉक्स असा सुमारे ६० हजार ५४४ रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झाली असून पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक ज्ञानेश्वर शेळके करीत आहेत.