नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- फर्नांडीस वाडी भागात पुढे चेकींग चालू असल्याची बतावणी करीत मदतीच्या बहाण्याने घराबाहेर पडलेल्या वृध्दास गाठून भामट्यांनी सोनसाखळीसह दोन सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्या आहे. याप्रकरणी करमसिंह करसन पटेल (८० रा.अनिकेत सोसा.तरणतलाव) यांनी तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पटेल मंगळवारी (दि.२१) सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले होते. तरण तलावाकडून ते फर्नांडीसवाडी रोडने फेरफटका मारत असतांना ही घटना घडली. अकरा वाजेच्या सुमारास गणेश सर्व्हीसेस या दुकानाजवळ ते विश्रांतीसाठी बसले असता नजीकच्या पिंपळाच्या झाडाखाली दुचाकी पार्क करून आलेल्या दोघांनी त्यांना गाठले. पोलिस असल्याचे तसेच पुढे चेकींग चालू असल्याची बतावणी करीत भामट्यांनी त्यांना गळयातील सोनसाखळी व अंगठ्या काढून ठेवण्यास भाग पाडले. यावेळी लॉकिटसह अंगठ्या रूमालात ठेवण्यासाठी मदतीचा बहाणा करून त्यांनी सुमारे एक लाख ३७ हजार रूपये किमतीचे अलंकार हातोहात लांबविले. संशयितांनी फर्नाडीसवाडीच्या दिशेने दुचाकीवर प्रयान केल्यानंतर पटेल यांनी रूमालाची गठडी तपासली असता फसवणुकीचा हा प्रकार समोर आला अधिक सहाय्यक निरीक्षक डगळे करीत आहेत.