नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरात वेगवेगळया भागात दोन घरफोड्या झाल्या असून त्यात ३८ लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. पहिली घटना टाकळीरोडवरील अनुसयानगर भागात घडली. प्रशांत नाना खडताळे (रा.सनसाईट सोसा.अनुसयानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. खडताळे कुटुंबिय रविवारी (दि.१९) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली ३४ लाखाची रोकड व दोन सोन्याच्या अंगठ्या असा सुमारे ३४ लाख ७० हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खांडवी करीत आहेत. दुसरी घटना हिरावाडी येथे घडली. येथील योगेश शंकर साळी (रा.शिवनयन अपा. सप्तशृंगी हॉस्पिटल जवळ कमलनगर) हे सोमवारी (दि.२०) आपल्या कुटुंबियांसह बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून हॉलमधील लोखंडी कपाटात ठेवलेली दोन लाखाची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ३ लाख ५९ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक कासर्ले करीत आहेत.