नाशिक : पेठरोड भागात मामाकडे कामाचे पैसे मागितले या कारणातून दोघा भाच्यानी एकावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात तरूण जखमी झाला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून एकास अटक केली आहे. दीपक सुनिल लोंढे (१९ रा.म्हाडा बिल्डींग,सम्राटनगर,दिंडोरीरोड) असे अटक केलल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी रंगनाथ भिमा जाधव (२४ रा.एरंडवाडी,पेठफाटा) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. जाधव याने लोंढे बंधूच्या मामाकडे कामाचे पैसे मागितले होते. याप्रसंगी कशाचे पैसे असे म्हटल्याने जाधव याने दीपक याच्या कानशिलेत लगावल्याने हा वाद झाला. या घटनेनंतर रविवारी दुपारच्या सुमारास जाधव पेठरोडवरील म्हसोबा मंदिराकडून पेठ फाट्याच्या दिशेने पायी जात असतांना दीपक व त्याचा अल्पवयीन भावाने त्यास गाठले. यावेळी दोघांनी पैसे मागण्याचा व थोरल्या भावास चापट मारल्याचा जाब विचारत शिवीगाळ केली. याप्रसंगी अल्पवयीन भावाने कमरेला लावलेला कोयता काढून जाधव याच्यावर वार केला. या घटनेत जाधव जखमी झाला असून पोलिसांनी दिपकला अटक केली असून अधिक तपास पोलिस नाईक बैरागी करीत आहेत.