शिवजयंती मिरवणुकीत दोघा बाऊन्सरांनी बेकायदा एअरगण बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवजयंती मिरवणुकीत दोघा बाऊन्सरांनी बेकायदा एअरगण बाळगल्याप्रकरणी सिक्यूरिटी एजन्सी संचालकांसह दोघांविरूध्द भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिरोज नुरमोहम्मद खान (३१ रा.अरिंगळे मळा,सिन्नरफाटा), रौफ मौला शेख (४० रा.वडाळागाव) व राजू शफिक शेख (३१ रा.अरिंगळे मळा,सिन्नरफाटा) अशी विनापरवानगी एअरगण बाळगणा-या संशयितांची नावे आहेत.
याप्रकरणी शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ चे कर्मचारी प्रदिप म्हसदे यांनी तक्रार दाखल केली आहे. रविवारी सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह सुरू असतांना सायंकाळच्या सुमारास वाकडी बारव भागात एका मंडळाच्या अध्यक्षाचे सिक्युरिटी गार्ड विनापरवाना बेकायदेशीर एअरगन बाळगून असल्याचे पथकास आढळून आले. पोलिस चौकशी दोघा संशयिताकडे एअरगन बाळगण्याबाबत कुठल्याही प्रकारचा परवानी नसल्याचे निष्पन्न झाल्याने सिक्युरिटी एजन्सीचे संचालक फिरोज खान यांच्यासह दोघा बाऊन्सरांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक म्हसदे करीत आहेत.
……….
घरात चक्कर येवून पडल्याने ४१ वर्षीय महिलेचा मृत्यू
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात राहते घरात चक्कर येवून पडल्याने ४१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. मिरा पिनू पवार (रा.साती आसरा कॉलनी,पाझर तलावा जवळ) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पवार या सोमवारी (दि.२०) अचानक आपल्या राहत्या घरात चक्कर येवून पडल्या होत्या. पती पिनू पवार यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक हिंडे करीत आहेत.