प्रवासी वाहतूक करणारी चारचाकी चालकाने पळवून नेली; गुन्हा दाखल
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रवासी वाहतूक करणारी चारचाकी चालकाने पळवून नेल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार दिवस उलटूनही चालक वाहनासह न परतल्याने मालकाने पोलिसात तक्रार केली आहे. सलमान असे संशयित चालकाचे नाव आहे. याप्रकरणी मुस्ताक जलाल सय्यद (रा.खोडेनगर वडाळारोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. सय्यद यांच्या मालकीच्या एमएच ०२ डीजी ९०६५ या इको कंपनीच्या चारचाकीवरील सलमान चालक असून शुक्रवारी (दि.१७) रात्री तो द्वारका भागातून कार घेवून गेला तो अद्याप परतला नाही. ठाणे येथील प्रवासी भाडे असल्याचे सांगून तो वाहन घेवून गेला असून चार दिवस उलटूनही त्याचा संपर्क होवू न शकल्याने सय्यद यांनी पोलिसात धाव घेतली आहे. अधिक तपास हवालदार टेमगर करीत आहेत.
……..
५३ वर्षीय महिलेची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ५३ वर्षीय महिलेने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना श्रध्दाविहार कॉलनीत घडली. कविता अवधुत तुसे (रा.जनाई बंगला,श्रध्दा विहार कॉलनी) असे मृत महिलेचे नाव आहे. तुसे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कविता तुसे यांनी रविवारी (दि.१९) रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत भाऊ अतुल कुमावत यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पारणकर करीत आहेत