नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईच्या ट्रकचालकाने मालवाहतूक तब्बल पाच लाखाचा माल चोरीच्या उद्देशाने परस्पर गहाळ केल्याप्रकरणी पंचवटी पोलिस स्थानकात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मेडिसीन, हार्डवेअर,धुप बॉक्ससह सायकल पार्टचे बंडल, ट्यूब आणि तुपाच्या डब्यांचा समावेश आहे. हितेश नानजीभाई पटेल (रा.विक्रोळी,मुंबई ) असे संशयित ट्रकचालकाचे नाव आहे. याप्रकरणी हिरावाडीरोडवरील श्री नाशिक गुडस ट्रान्सपोर्टचे संचालक नैतिक महेश कतिरा यांनी तक्रार दाखल केली आहे. पटेल जीजे २७ टीटी ७५७० या आयशर ट्रकवरील चालक असून तो शनिवारी (दि.१८) रात्री अहमदाबाद येथून शहरातील विविध ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून मागविण्यात आलेला माल घेवून आला होता. रात्रीच्या वेळी पेठरोडवरील शरदचंद्र मार्केट येथील प्रवेशद्वार भागात त्याने आपला ट्रक खाली केला. त्यात कतिरा यांनी मागविलेला माल मिळून आला नाही. त्यात आठ मेडिसीन बॉक्स,सायकल पार्टचे दोन बंडल, हार्ड वेअर वस्तूचा एक बॉक्स,धुप बॉक्स, ट्यूबच्या ११ बॅग आणि सुमारे १५८ तुपाचे डबे असा सुमारे ४ लाख ८२ हजार २९९ रूपये किमतीचा ऐवज होता. संशयिताने सदर माल चोरीच्या उद्देशाने परस्पर गहाळ केल्याचा आरोप करण्यात आला असून अधिक तपास हवालदार कुलकर्णी करीत आहेत.