नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निलगीरीबाग भागात पुढे खून झाला असल्याची बतावणी करीत भामट्यांनी वृध्दाच्या गळयातील सोनसाखळीसह अंगठी असा सुमारे साडे ६२ हजाराचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी रावसाहेब भास्कर जगताप (७६ रा. शक्तीनगर, हिरावाडी) यांनी तक्रार दाखल केली असून आडगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगताप बुधवारी (दि.९) कामानिमित्त निलगिरी बाग परिसरात गेले होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास भाजी मार्केट परिसरातून ते पायी जात असतांना अनोळखी दोघांनी त्यांची वाट अडविली. परिसरात मर्डर झाला आहे. एवढे दागिने घालून फिरू नका, अशी बतावणी करीत संशयितांनी त्यांना गळयातील सोनसाखळी आणि बोटातील अंगठी रूमालात बांधण्याचा सल्ला दिला. यावेळी मदतीचा बहाणा करून भामट्यांनी ६२ हजार ५०० रूपये किमतीचे अलंकार हातोहात लांबविले असून, अधिक तपास उपनिरीक्षक बागुल करीत आहेत.
मखमलाबाद रस्त्यावर भरदिवसा घरफोडी
भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ६५ हजाराच्या ऐवज लंपास केले. मखमलाबाद रस्त्यावरील क्रांतिनगरात भागात ही घटना घडली. यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिणे चोरट्यांनी चोरुन नेले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर युवराज वाघमोडे (२३ रा. शंभु अपार्टमेंट, क्रांतीनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
वाघमोडे कुटुंबिय बुधवारी (दि.९) अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ६५ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खैरनार करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten