नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात पार्क केलेल्या दोन दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुंबईनाका आणि सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना औद्योगीक वसाहतीतील अशोक नगर भागात घडली. अनिल लोटन अहिरराव (रा. विश्वास अपार्टमेंट, डीएस शूज शॉप शेजारी) यांनी तक्रार दाखल केली आहे. अहिरराव यांची स्प्लेंडर एमएच १५ सीवाय ४५८० गेल्या २० जून रोजी रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सुर्यवंशी करीत आहेत.
दुसरी घटना अशोका मार्ग भागात घडली. धात्रक फाटा परिसरातील राजेश कुमार सिंग (रा.वॉटर टँकमागे,धात्रक फाटा) हे गेल्या २५ जून रोजी अशोका मार्ग भागात गेले होते. जुने सागर स्विट मागील प्रियवंदा सोसायटीच्या पार्किंगमध्ये त्यांनी आपली मोटारसायकल पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.
सिडकोत घरफोडी
घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ६७ हजाराच्या ऐवज लंपास केल्याची घटना सिडकोतील साईबाबानगर भागात घडली. या घरफोडीत रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी शाहरूख खलील मनियार (रा.साईबाबानगर,सिडको) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनियार कुटुंबिय रविवारी (दि.२) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरातील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ६७ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.