नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विजय ममता थिएटर परिसरात रोकड तपासणीच्या नावाखाली तोतया लेखापालने एका हॉटेल चालकास सव्वा लाखास गंडा घातला. या फसणुकप्रकरणी सौरभ संतोष शेट्टी (रा. पाथर्डी फाटा) यांनी तक्रार दाखल केली आहे. उपनगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हॉटेल व्यावसायिक शेट्टी यांचे नाशिक पुणे मार्गावरील विजय ममता थिएटर परिसरात मॅकडॉलस नावाचे प्रसिध्द रेस्टॉरंट आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास शेट्टी आपला व्यवसाय सांभाळत असतांना अनोळखी इसमाने हॉटेल गाठले. यावेळी त्याने आपण ऑडिटर असून रेस्टॉरंटचे दप्तर तपासणी करायची असल्याचे सांगितले. शेट्टी यांनी सदर व्यक्तीकडे हॉटेलच्या दरडोई होणाऱ्या व्यवसायासह खर्च आणि अन्य बाबींचा हिशोब ठेवला.
यानंतर भामट्याने गल्यातील रोकड मोजण्याचा बहाणा करून ही रक्कम हातोहात लांबविली. रोकड मोजत असतांना संशयिताने सुमारे १ लाख २६ हजार २९३ रूपये हातोहात लांबविले असून तो पसार झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. शेट्टी यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली असून अधिक तपास उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.