नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दारू दुकानदाराकडे खंडणीची मागणी करणा-या दोघांना पोलिसांनी गजाआड केले आहे. ही घटना औद्योगीक वसाहतीतील घरकुल योजना रोड भागात घडली होती. खंडणी मागणा-या दोघांनी ग्राहकांना हाकलून देत बळजबरीने दुकानात शिरून शिवीगाळ व तोडफोड केल्यामुळे हा प्रकार पोलिसात पोहचला. व्यवसाय सुरू ठेवायचा असेल तर दरमहा दोन हजार रूपये द्यावे लागतील अशी धमकी या दोघांनी यावेळी दिली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंकज शिवदास वराडे (२४) व प्रविण सुनिल काळे (२३ रा. दोघे घरकुल योजना, अंबड लिंकरोड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी आनंद दिनेश तिवारी (रा. मंगलमुर्ती नगर, जेलरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. तिवारी यांचा घरकुल योजना रोडवर अपना वाईन शॉप नावाचे दारू दुकान असून शुक्रवारी (दि.४) सायंकाळच्या सुमारास ते आपल्या दुकानात व्यवसाय सांभाळत असतांना ही घटना घडली.
दुकानावर आलेल्या दोघांना आरडाओरड करून ग्राहकांना तेथून हाकलुन दिले. यावेळी बळजबरी दुकनात शिरून संशयितांनी येथे व्यवसाय करायचा असेल तर दरमहा दोन हजार रूपयांची खंडणी द्यावी लागेल अशी धमकी दिली. यावेळी तिवारी यांनी खंडणी देण्यास विरोध केल्याने संतप्त दुकलीने शिवीगाळ करीत दुकानातील सामानाची तोडफोड करून नासधुस केली. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आल्याने अंबड पोलिसांनी धाव घेत दोघांना बेड्या ठोकल्या असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मुगले करीत आहेत.
घरगुती गॅस वाहनात भरणाऱ्यावर कारवाई
मालधक्कारोड भागात शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने घरगुती गॅस वाहनात भरूण देणाऱ्या एकावर कारवाई केली. या कारवाईत सुमारे साडे अठरा हजार रूपये किमतीचे गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशपाक इलियास अन्सारी (५१ रा.जियाउद्दीन डेपो चाळ नं.३७ मालधक्कारोड) असे कारवाई करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
मालधक्कारोड भागात बेकायदा वाहनांमध्ये घरगुती गॅस भरून दिला जात असल्याची माहिती युनिट २ च्या पथकास मिळाली होती. त्यानुसार शनिवारी (दि.५) सायंकाळी बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी ही कारवाई केली. जियाउद्दीन डेपो भागात संशयित बेकायदा गॅस वाहनात भरतांना आढळून आला. या ठिकाणी भरलेली आणि रिकामी सिलेंडर मिळून आली असून गॅस भरण्याच्या साहित्यासह सिलेंडर असा सुमारे १८ हजार ५१० रूपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याबाबत पोलिस नाईक नितीन फुलमाळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक गायकवाड करीत आहेत.
nashik city crime police arrest extortion