नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील पाटीलनगर भागात पोस्टातून पैसे काढून घराकडे परतणा-या सेवानिवृत्त वृध्दाच्या हातातील पिशवी पळविणा-या बुलेटस्वारास पोलिसांनी सीसीटिव्ही यंत्रणेच्या माध्यमातून अवघ्या एका तासात गजाआड केले आहे. खुशाल शरदचंद्र मोरे (१९ रा. सावतानगर, सिडको) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. वृध्दाच्या पिशवीत रोकडसह मोबाईल आणि पासबुक असा सुमारे ३५ हजाराचा ऐवज होता. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सेवानिवृत्त रंगनाथ बबनराव माळवे (७८ रा. नवनाथ हार्डवेअर समोर, त्रिमुर्ती चौक) हे मंगळवारी (दि.२७) पेन्शनची रक्कम काढण्यासाठी पाटीलनगर येथील पोस्ट ऑफिस मध्ये गेले होते. दुपारी एकच्या सुमारास ते पैसे काढून घराकडे परतत असतांना ही घटना घडली होती. महादेव मंदिराजवळून ते आपल्या घराकडे पायी जात असतांना राखाडी रंगाच्या बुलेटवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या हातातील कापडी पिशवी हिसकावून नेली होती. या पिशवीत रोकड,मोबाईल व पोस्टाचे दोन पासबुक असा सुमारे ३५ हजाराचा ऐवज होता.
याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही तपासले असता संशयित पोलिसांच्या हाती लागला. गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी सागर जाधव यांनी संशयितास ओळखल्याने त्यास बेड्या ठोकल्या असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. संशयिताच्या ताब्यातून रोकड व मोबाईलसह सुमारे ३५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्ती चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्त श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने केली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक वसंत खेतले आणि शिपाई ढेरंगे करीत आहेत.