सिन्नरफाटा परिसरात घरफोडी; चोरट्यांनी ७५ हजाराचा ऐवज केला लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ७५ हजाराचा ऐवज लंपास केला. सिन्नरफाटा परिसरातील खर्जुल मळा भागात झालेल्या या घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे लंपास केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धर्मेश कृष्णाजी कुवर (रा.हरी संस्कृती अपा.खर्जुलमळा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कुवर कुटुंबिय रविवारी (दि.२८) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा ७४ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.
वज्रेश्वरी नगर भागात भरदिवसा घरफोडी
दिंडोरीरोडवरील वज्रेश्वरी नगर भागात भरदिवसा गॅलरीतून उघड्या घरात शिरत चोरट्यांनी सुमारे नऊ हजाराच्या ऐवज चोरुन नेला. त्यात पितळी साहित्य, मनगटी घड्याळ व मोबाईलचा समावेश आहे. ही घटना घडली असून याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलीप भिवा साबळे (६२ रा.वज्रेश्वरीनगर,दिंडोरीरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. साबळे कुटुंबिय सोमवारी (दि.२९) आपआपल्या कामात व्यस्त असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या उघड्या घराच्या गॅलरीतून दुस-या मजल्यावर चढत ही चोरी केली. घरात शिरलेल्या भामट्यांनी पितळाची भांडी, मनगटी घड्याळ व मोबाईल असा सुमारे ८ हजार ८०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास पोलिस नाईक सानप करीत आहेत.