नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दहा महिने उलटूनही कार परत न केल्याने मुंबईनाका पोलिस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अल्पावधीसाठी नेलेल्या कारची परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकारही समोर आला आहे. हमीद माजित शहा (रा.रॉयल कॉलनी,द्वारका) असे कारचा अपहार करणा-या संशयिताचे नाव आहे.
याप्रकरणी आकाश मच्छींद्र गायकवाड (रा.ब्रम्हपुत्रा सोसा.आरटीओ कॉर्नर,दिंडोरीरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. गायकवाड यांची स्विफ्ट कार एमएच १५ एचएम २३२२ संशयिताने गेल्या २० नोव्हेंबर २०२२ रोजी अल्पावधीसाठी नेली होती. मात्र दहा महिने उलटूनही त्याने परत न केल्याने गायकवाड यांनी शोध घेतला असता संशयिताने तिची विल्हेवाट लावून दिल्याचे आढळून आले. संशयिताने कारचा परस्पर अपहार केल्याचा संशय बळावल्याने गायकवाड यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास हवालदार टेमगर करीत आहेत.
तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला… दोघे गजाआड
आनंदवली येथे मागील भांडणाची कुरापत काढून तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला करणा-या दोन जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे. या हल्यात तरूण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनू उर्फ दादू उर्फ आदेश सुरेश शिरसाठ (२२ रा. आनंदवली,गंगापूररोड) व गौरव दत्तात्रेय जोशी (२३ रा.आराध्या अपा.चांदशीरोड) अशी अटक केलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत.
याप्रकरणी संदिप पुंजा मोठे (२४ रा.शिवनगर,आनंदवली) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. मोठे गुरूवारी (दि.३) आनंदवली येथील महापालिकेच्या सार्वजनिक शौचालय भागात गेला असता ही घटना घडली. दोघांनी त्यास गाठून मागील भांडणाची कुरापत काढली. यावेळी संतप्त दोघींनी त्यास शिवीगाळ व दमदाटी करीत मारहाण केली. या हाणामारीत एकाने त्याच्यावर धारदार शस्राने वार केले. या घटनेत मोठे जखमी झाला असून त्याच्याजबाबावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार झाडे करीत आहेत.
nashik city crime police theft car youth attack
gangapu road mumbai naka