नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रवाशांच्या सतर्कतेमुळे संगमनेर येथील चोरटी महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. प्रवासी महिलांनी चोप देत तिला पोलिसांच्या स्वाधिन केले असून, बसमध्ये चढणा-या महिलेच्या पर्स मधील दागिणे चोरी करण्याचा प्रयत्नात ती हाती लागली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निर्मला राजा नरवरे (४२ रा.मोची गल्ली,सय्यद बाबा चौक संगमनेर,अ.नगर) असे संशयित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पुजा माने (रा.जामगाव जि.औरंगाबाद) यांनी तक्रार दाखल केली आहे. माने गुरूवारी (दि.२७) सायंकाळी महामार्ग बसस्थानकात एस.टी.प्रवासासाठी आल्या असता ही घटना घडली. सायंकाळच्या सुमारास सोलापूर बसमध्ये त्या चढत असतांना गर्दीची संधी साधत संशयित भामट्या महिलेने त्यांच्या पर्सची चैन उघडत दागिणे चोरी करण्याचा प्रयत्न केला. ही बाब पाठीमागून चढणा-या अन्य महिलेच्या निदर्शनास आल्याने तिने आरडाओरड करीत सदर महिलेस रंगेहात पकडले. यावेळी संतप्त प्रवाश्यांनी व महिलांना चोरट्या महिलेस चोप देत पोलिसांच्या स्वाधिन केले. या बसस्थानकात वारंवार चोरीचे प्रकार घडत असल्याने या वेळी प्रवाश्यांचा संताप दिसून आला. अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.
पंचवटीत गावगुंड गजाआड
पंचवटी मार्केट यार्डात तलवार घेवून फिरणा-या गावगुंडास पोलिसांनी गजाआड केले आहे. पोलिसांनी या गुंडाच्या ताब्यातून तलवार हस्तगत करण्यात करुन पंचवटी पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदेश उर्फ काळू सुधाकर पगारे (३० रा.भेंडीचाळ,पेठरोड) असे अटक केलेल्या संशयित तलवारधारीचे नाव आहे.
मार्केट यार्डात एक तरूण तलवारीचा धाक दाखवत दहशत माजवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी (दि.२७) पोलिसांनी धाव घेत संशयितास बेड्या ठोकल्या. त्याच्या ताब्यातून धारदार तलवार जप्त करण्यात आली असून याप्रकरणी पोलिस कर्मचारी राकेश शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार काकड करीत आहेत.