नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्ग बस स्थानकात बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा उचलत चोरट्यांनी एका प्रवाश्याच्या गळयातील सोनसाखळी लंपास केली. याप्रकरणी नागनाथ रामचंद्र जाधव (रा. पनवेल जि. रायगड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाधव शनिवारी (दि.६) कामानिमित्त शहरात आले होते. काम आटोपून ते परतीच्या प्रवासासाठी महामार्ग बसस्थानकात आले असता ही घटना घडली. पनवेल नाशिक या बसमध्ये ते चढत असतांना गर्दीचा फायदा उचलत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळयातील सुमारे ७५ हजार रूपये किमतीची सोनसाखळी हातोहात लांबविली. अधिक तपास हवालदार गाढवे करीत आहेत. बसस्थानक आवारातील भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवाश्यांकडून होवू लागली आहे.
हातातील मोबाईल दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेला
औद्योगीक वसाहतीतील अंबड लिक रोड भागात फोनवर बोलत रस्त्याने पायी जाणा-या तरूणाच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमलेश बाबुलाल पाटील (२२ रा.माऊली लॉन्सजवळ,डीजीपीनगर) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
पाटील सोमवारी (दि.८) औद्योगीक वसाहतीत गेला होती. फोनवर बोलत तो अंबड लिंकरोडने आपल्या घराकडे परतत असतांना ही घटना घडली. रस्त्याने पायी जात असतांना दातीर चौकात पाठीमागून दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्याच्या हातातील सुमारे दहा हजार रूपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मुगले करीत आहेत.