नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– हॉटेलमध्ये चालणारा हुक्का पार्लरचा अड्डा पोलिसांनी उध्वस्त करुन प्रतिबंधीत सुगंधी तंबाखूसह हुक्का पिण्याचे साहित्य जप्त केले. माडसांगवी रोडवर हे हुक्का पार्लर सुरु होते. याप्रकरणी हॉटेल मालकासह तीन जणांविरूध्द आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॉटेल मालक रिबूल अहमद बोनोबाईयान (मुळ रा. आसाम हल्ली सेवन हॉर्स हॉटेल, औरंगाबादरोड ),भुषण जगन्नाथ देवरे (रा.अमित सोसा.पाथर्डी फाटा) व कृष्णा हिरामण पेखळे (रा.चारी नं.६ माडसांगवी ता.जि.नाशिक) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी आडगावचे पोलिस कर्मचारी विलास चारोस्कर यांनी फिर्याद दाखल केली आहे.
औरंगाबाद रोडवरील वैष्णवी गार्डन लॉन्स भागातील सेवन हॉर्स हॉटेल मध्ये बेकायदा हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.२४) आडगाव पोलिसांनी छापा टाकला असता तेथे ग्राहकांना सुगंधी तंबाखूसह पॉट पुरवितांना संशयित मिळून आले. या ठिकाणाहून सुमारे पाच हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अधिक तपास हवालदार ठापसे करीत आहेत.
महिलेच्या पर्स मधील ५० हजार लंपास
जुने सिबीएस बस स्थानकात बसमध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधत चोरट्यांनी महिलेच्या पर्स मधील पन्नास हजार रूपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी रजनी राहूल गांगुर्डे (३४ रा.वणी ता.दिंडोरी) यांनी तक्रार दाखल केली असून सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रजनी गांगुर्डे या मंगळवारी (दि.२५) शहरात आल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास परतीच्या प्रवासासाठी त्या सीबीएस बसस्थानकात गेल्या असतांना ही घटना घडली. कळवण बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्यांनी गर्दीची संधी साधत त्यांच्या पर्सची चैन उघडून पन्नास हजार रूपयांची रोकड हातोहात लांबविली. अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत.