नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दुचाकीवर धारदार चाकू घेवून फिरणा-य दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्या ताब्यातून चाकूसह दुचाकी आणि मोबाईल हस्तगत केली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय शिवाजी पवार (२१ रा.मधुबन कॉलनी,नवनाथनगर) व प्रशांत धर्मेंद्र बारे (१९ रा.कर्णनगर,आरटीओ समोर) अशी अटक करण्यात आलेल्या चाकूधारींची नावे आहेत.
काठे गल्लीत दुचाकीवर फिरणा-या दोघांकडे चाकू असल्याची माहिती मंगळवारी (दि.१८) रात्रीपोलिसांना मिळाली होती. खब-याने दिलेल्या माहितीच्या आधारे भद्रकाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने टाकळीरोडवरील नेहरू गार्डन चौक गाठून दोघांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे धारदार चाकू मिळून आला. संशयितांच्या मुसक्या आवळत पथकाने दुचाकीसह चाकू व मोबाईल असा सुमारे ६५ हजार २०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून याबाबत अंमलदार सागर निकुंभ यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक कोळी करीत आहेत.
अंजनेरी गडावर सातपूरच्या व्यक्तीची आत्महत्या
अंजनेरी गडावर एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रुपेश दत्तात्रय माळी (वय ४३ रा. रामानंदनगर, एबीबी कंपनीच्या मागे, सातपूर, नाशिक) असे या व्यक्तीचे नाव आहे. माळी हे सकाळी ६ ते ६.३० वाजता अंजनेरी गडावर आले होते. त्यानंतर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान अंजनेरी येथुन फोन आला की एका माणसाने झाडावर गळफास घेतला आहे. त्र्यंबक पोलीस लगेच घटनास्थळी पोहचले. झाडावरून मृतदेह खाली उतरवुन पंचनामा केला. पोलीसांचा अंदाज आहे की नैराश्यातून आत्महत्या केली असावी. कदाचित कर्जबाजारी झाला असावा. दरम्यान त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास पो. नि. बिपिन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रुपेश कुमार मुळाणे, गंगावणे, जाधव आदी करत आहेत.
शहरातून आणखी दोन बाईकची चोरी
शहरात वेगवेगळ्या भागात पार्क केलेल्या दोन दुचाकी चोरीला गेल्या. याप्रकरणी सरकारवाडा आणि इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील निंबा तानाजीराम शिंपी (रा. शाहूनगर, भडगावरोड) हे गेल्या शनिवारी (दि.१५) कामानिमित्त शहरात आले होते. महात्मा गांधी रोडवरील डेरी डॉन आईस्क्रिम दुकानासमोर त्यांनी आपली स्प्लेंडर एमएच १९ डब्ल्यू ५२६६ पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली.
याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार बागुल करीत आहेत. दुसरी घटना पाथर्डी फाटा भागात घडली. अमोल यादवराव मटाले (रा.निखील पार्क, कामटवाडा) हे मंगळवारी (दि.१८) रात्री पाथर्डी फाटा भागात गेले होते. वक्रतुंड हॉस्पिटल व बंधूराज हॉटेल मार्गावर त्यांनी आपली शाईन एमएच १५ जेएफ २८६९ दुचाकी पार्क केली असता ती चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक पवार करीत आहेत.