नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील उषा हॉस्पिटल भागात फोनवर बोलत रस्त्याने पायी जाणा-या तरूणाच्या हातातून दुचाकीस्वार भामट्यांनी मोबाईल हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी राहूल अरविंद बेडसे (२६ मुळ रा.म्हसदी,धुळे हल्ली काकडे मळा,अशोकनगर) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली असून अंबड पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेडसे शनिवारी (दि.१५) सिडको परिसरात गेले होते. रात्री नऊ वाजेच्या सुमारास तो महामार्गावरील उषा हॉस्पिटल समोरून पायी जात असतांना ही घटना घडली. मोबाईलवर बोलत रस्त्याने तो पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या भामटयांनी त्यांच्या हातातील सुमारे ११ हजार रुपे किमतीचा मोबाईल हिसकावून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.
पोलिसांकडून अवैध दारु विक्रीचा पर्दाफाश
पोलिसांनी शहरात सोमवारी हाडोळा व तेलंगवाडी भागात छापे टाकून दोन विक्रेत्यांवर कारवाई करुन ३८ हजार ८६५ रूपये किमतीचा देशी आणि विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प आणि पंचवटी पोलिस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पहिली कारवाई तेलंगवाडीतील लक्ष्मणनगर भागात करण्यात आली. येथे दारू विक्री होत असल्याच्या माहितीवरून पंचवटी पोलिसांनी सोमवारी दुपारच्या सुमारास छापा टाकला असता राजू बाबुराव जाधव (४५ रा.लक्ष्मणनगर,तेलंगवाडी) हा आपल्या राहत्या घरात दारू विक्री करतांना मिळून आला. संशयिताच्या घरझडतीत सुमारे २ हजार १७५ रूपये किमतीचा देशी दारूचा साठा पोलिसांच्या हाती लागला असून याप्रकरणी पोलिस नाईक मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
दुसरी कारवाई हाडोळा भागात करण्यात आली. येथे रविवारी रात्री पोलिस पथकाने धाव घेतली असता रोहित देविदास गायकवाड (३२ रा. काळे चौक, हाडोळा दे.कॅम्प) हा रेहमाननगरकडे जाणा-या मार्गावरील एका भिंतीच्या आडोश्याला बेकायदा दारू विक्री करतांना मिळून आला. संशयिताच्या ताब्यातून सुमारे १ हजार ६९० रूपये किमतीच्या विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या असून याप्रकरणी पोलिस शिपाई दिपक जठार यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार सिध्दपुरे करीत आहेत.