नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोळे कॉलनीत सोसायटीच्या भिंतीवरून उडी मारत दोन महिलांनी एलआयसी इमारतीच्या आवारातील जनरेटरची बॅटरी चोरून नेल्याची घटना सीसीटिव्ही यंत्रणेत कैद झाली आहे. या चोरीनंतर सीसीटीव्ही फुटेचज्या आधारे पोलिस महिलांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उध्दव त्र्यंबक चौधरी (रा.फेम सिनेमा मागे,पुणे रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. भारतीय जीवन विमा निगमच्या शहर शाखा क्र.२ या गोळे कॉलनीतील कार्यालय परिसरात ही घटना घडली. गेल्या रविवारी (दि.९) दुपारच्या सुमारास अज्ञात दोघा भामट्यांनी कार्यालय बंद असल्याची संधी साधत सोसायटीच्या भिंतीवरून उडी मारून आवारातील जेनरेटर बॉक्स मधील सुमारे आठ हजार रूपये किमीतीची एक्साईज कंपनीची बॅटरी चोरून नेली. ही घटना सीसीटिव्ही यंत्रणेत कैद झाल्याने उघड झाली असून अधिक तपास हवालदार साबळे करीत आहेत.
पादचाऱ्याचा आयफोन हिसकावून नेला
रवी शंकर मार्गावर मोबाईलवर बोलत रस्त्याने जाणा-या व्यक्तीच्या हातातून दुचाकीस्वार भामट्यांनी महागडा आयफोन हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी शांताराम किसन नवाळे (रा.आदित्यनगर,अशोकामार्ग) यांनी तक्रार दाखल केली असून मुबईनाका पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवाळे गुरूवारी (दि.१३) सायंकाळच्या सुमारास रवी शंकर मार्ग भागात गेले होते. परिसरातून ते मोबाईलवर बोलत आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. पाठीमागून ट्रिपलसिट आलेल्या भामट्यांपैकी एकाने त्यांच्या हातातील सुमारे ७५ हजार रूपये किमतीचा आयफोन हिसकावून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गेंगजे करीत आहेत.