नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कुमावतनगर भागात उघड्या घरात शिरून चोरट्यांनी कपाटातील रोकडसह मोबाईलवर डल्ला मारल्याची घटना घडली. या घटनेत सुमारे ४० हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल रोपन रावत (रा. गुरूकृपा अपा. कुमावतनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. रावत कुटुंबिय मंगळवारी (दि.४) आपल्या घरात असतांना ही घटना घडली. सर्व मंडळी आपआपल्या कामात व्यस्त असतांना अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात शिरून हॉलमधील कपाटातील रोकड व मोबाईल असा सुमारे ४० हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत.
जुगार खेळणा-या त्रिकुटावर पोलिसांनी कारवाई
जुगार खेळणा-या त्रिकुटावर पोलिसांनी कारवाई केली आहे. जुने नाशिक परिसरातील ठाकरे रोड येथील मोची गल्लीत उघड्यावर हे त्रिकुट जुगार खेळत होते. त्यांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य असा सुमारे २ हजार २३० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुलाम गौस बशिर शेख (३४ रा.घास बाजार),फैजल मेहमुद पठाण (२२ रा.ठाकरे रोड) व प्रमोद शिरीष आरज (३७ रा.महादेव चौक,सिडको) अशी कारवाई करण्यात आलेल्या संशयित जुगारींची नावे आहेत.
मोची गल्लीतील बालाजी मंदिर परिसरात काही तरूण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.५) पोलिसांनी छापा टाकला असता संशयित मंदिराच्या बाजूला असलेल्या मोकळया जागी उघड्यावर पत्यांच्या कॅटवर पैसे लावून तीन पत्ती जुगार खेळतांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून २ हजार २३० रूपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून याप्रकरणी पोलिस शिपाई पोटींदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून जुगार अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलिस नाईक सय्यद करीत आहेत.