नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अज्ञात चार तस्करांनी कालिदास कला मंदिरापाठी मागे असलेल्या शिवाजी गार्डन मधून चंदनाचे झाड कापून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रणजित शंकर रामराजे (रा.गुरू गोविंदसिंग कॉलेज मागे.वडाळा पाथर्डीरोड ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शिवाजी गार्डन भागात बुधवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात चार चोरट्यांनी चंदनाच्या झाडाचा बुंधा कापून नेला. ही घटना परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेत कैद झाली असून पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत. अधिक तपास हवालदार बोंबले करीत आहेत.
लोखंडी बेंच चोरून नेले
गंगापूररोड भागात आयटीआयच्या आवारातून चोरट्यांनी लोखंडी बेंच चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेत सुमारे १४ हजार रूपये किमतीचे बेंच चोरट्यांनी चोरून नेले असून, याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब शिवाजी टर्ले (रा.विद्यानगर, मखमलाबादरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे.
टर्ले मविप्रच्या औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत कार्यरत असून सोमवारी (दि.१९) रात्री ही घटना घडली. उदोजी मराठा आवारातील आयटीआय ऑफिसच्या पाठीमागे ठेवलेले सुमारे १४ हजार रूपये किमतीचे घडीव लोखंडी बेंच चोरट्यांनी चोरून नेले. अधिक तपास पोलिस नाईक परदेशी करीत आहेत.