नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गॅस एजन्सीच्या डिलीव्हरी बॉयची १५ हजाराची रोकड चोरट्यांनी लंपास केली. नांदूरनाका भागात पैसे मोजण्याच्या बहाण्याने भामट्यांनी ही रक्कम चोरुन नेली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहूल दिनकर डांगळे (रा.जाधववाडी,ना.रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. डांगळे एका गॅस एजन्सीत डिलीव्हरी बॉय म्हणून काम बघतात. शनिवारी (दि.६) सायंकाळच्या सुमारास ते गॅस टाक्यांचे वितरण करून एजन्सीत पैसे भरण्यासाठी जात असतांना ही घटना घडली. नांदूरनाका येथील मांगीर बाबा सर्व्हीस स्टेशन येथे आपले वाहन थांबवून पैसे मोजत असतांना ही घटना घडली.
रस्त्याने जाणा-या चार जणांपैकी एकाने पैसे मोजण्यास मदत करण्याचा बहाणा करून ही रक्कम लांबविली. डांगळे यांना पैसे मोजण्यात गुंतवून संशयिताने सोबत असलेल्या तीन साथीदारांच्या माध्यमातून रोकडमधील १५ हजार ४९० रूपयांची रक्कम हातोहात लांबविली. हा प्रकार एजन्सीतील कॅशिअर कडे भरणा करीत असतांना निदर्शनास आला. अधिक तपास जमादार वाढवणे करीत आहेत.