नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकनाका भागातील पेट्रोल पंपावर व्यवस्थापकाच्या कॅबीन मध्ये शिरून एकाने रोकडसह मोबाईल असा सुमारे ३० हजाराचा ऐवज लंपास केला. ही चोरी सीसीटिव्ही यंत्रणेत कैद झाली आहे. सोहेल खान (रा.दुधबाजार,भद्रकाली) असे संशयित मोबाईल चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी विशाल दिलीप पानसरे (रा.चेतनानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. पानसरे त्र्यंबकनाका येथील जे.आर.मेहता या पेट्रोल पंपावर व्यवस्थापक असून सोमवारी (दि.१९) दुपारच्या सुमारास ते पंपावर देखरेख करीत असतांना ही घटना घडली. संशयित चोरट्याने व्यवस्थापकाच्या कॅबीनमध्ये बेकायदा प्रवेश करून रोकड व टेबलावरील मोबाईल असा सुमारे २९ हजार २०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना सीसीटिव्ही यंत्रणेत कैद झाल्याने या चोरीचा पर्दाफास झाला असून, अधिक तपास हवालदार बोळे करीत आहेत.
महिलेची सोन्याची पोत लांबवली
तपोवनातील जनार्दन स्वामी आश्रमातील हॉलमधील गर्दीत भामट्यांनी महिलेच्या गळयातील लाखाची सोन्याची पोत लंपास केली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण दिलीप सुराणा (रा.रामालय हॉस्पिटल जवळ,पंचवटी कारंजा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सुराणा या सोमवारी (दि.१९) धार्मिक कार्यक्रमानिमित्त जनार्दन स्वामी आश्रमात गेल्या होत्या. दुपारच्या सुमारास त्या हॉलमधील कार्यक्रमात सहभागी झाल्या असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी गर्दीची संधी साधून त्यांच्या गळ््यातील सुमारे ९९ हजार रूपये किमतीची सोन्याची पोत हातोहात लांबविली. अधिक तपास पोलिस नाईक वाघ करीत आहेत.