नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड येथील तरणतलाव भागात असलेल्या जगताप मळा येथे भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे चार लाखाचा ऐवज लंपास केला. या घरफोडीत रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे चोरट्यांनी चोरुन नेले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप चंदुमल दरयानी (रा.हरिसंकल्प अपा.जगतापमळा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दरयानी कुटुंबिय शनिवारी (दि.१७) दुपारच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे लॅचलॉक तोडून ही चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यानी बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ३ लाख ९० हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक उंडे करीत आहेत.
तलवारीचा धाक दाखविणारा जेरबंद
उपनगर पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. बाळा उर्फ सोमेश्वर उत्तम हंगारगे (२६ रा.स्वागत बिल्डींग,विहीतगाव) असे अटक केलेल्या संशयित तलवारधारीचे नाव आहे. विहीतगाव परिसरात तलवार हंगारगे फिरत होता. त्याच्या ताब्यातून धारदार तलवार हस्तगत करण्यात आली आहे. हंगारगे आपल्या घर परिसरात तलवारीचा धाक दाखवित दहशत माजवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपनगर पोलिसांच्या पथकाने रविवारी (दि.१८) धाव घेत ही कारवाई केली. संशयिताच्या मुसक्या आवळत पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात धारदार तलवार मिळून आली. याबाबत पोलिस कर्मचारी जयंत शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार कोकाटे करीत आहेत.