नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुने सिबीएस बसस्थानकात बसमध्ये चढतांना गर्दीची संधी साधत चोरट्यांनी परभणी येथील एका डॉक्टरचा मोबाईल लंपास केला. याप्रकरणी डॉ. प्रसाद नागनाथराव काळे (रा.सरस्वतीनगर,परभणी) यांनी तक्रार दाखल केली असून सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ.काळे कामानिमित्त शहरात आले होते. रविवारी (दि.११) सकाळच्या सुमारास परतीच्या प्रवासासाठी ते बसस्थानकात गेले असता ही घटना घडली. बसमध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशातील सुमारे दहा हजार रूपये किमतीचा मोबाईल चोरून नेला. अधिक तपास पोलिस नाईक गायकवाड करीत आहेत.
युवातीचा फोन लंपास
सीबीएस बसस्थानक आवारात फोनवर बोलत रस्त्याने पायी जाणा-या युवतीच्या हातातील मोबाईल स्कुटीस्वाराने हिसकावून नेल्याची घटना वर्दळीच्या घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदिनी रविंद्र सोनार (२१ रा.पंडीत कॉलनी,मॅरेथॉन चौक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सोनार शनिवारी (दि.१०) रात्री जुने सिबीएस बसस्थानकातून आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली.
फोनवर बोलत बसस्थानकाबाहेर त्या पडत असतांना पाठीमागून स्कुटीवर आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भोये करीत आहेत.