नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हॉटेल कर्मचा-याने वृद्ध प्रवासी महिलेचे डायमंडचे दागिणे लंपास केले. याप्रकरणी हॅाटेलमध्ये थांबलेल्या नंदा हेमंत बंगेरा (६३ रा.लोखंडवाला कॉम्प्लेक्स अंधेरी, मुंबई) यांनी तक्रार दाखल केली आहे. इंदिरानगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भुषण सोपान वाघ असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित हॉटेल कर्मचा-याचे नाव आहे. बंगेरा कुटुंबिय गुरूवारी (दि.१) शहरात आले होते. सायंकाळच्या सुमारास कामानिमित्त ते हॉटेल बाहेर पडले असता ही घटना घडली.
अज्ञात चोरट्यांनी बंद रूम उघडून बंगेरा यांच्या बॅगेतील सुमारे २० हजार रूपये किमतीचे दोन रिअल डायमंडचे कानातले चोरून नेले. ही घटना कुटूंबिय पुन्हा हॉटेल मध्ये आले असता उघडकीस आली. हॉटेल मध्ये सेवा बजावणा-या संशयिताने ही चोरी केल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने त्याच्याविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक हादगे करीत आहेत.